Wednesday, July 17, 2019

१ मे २००९



रात्र जी डावी होती डावरी होती अभिताभ बच्चनसारखी
उजवी झालीये शाहरुखखानसारखी

श्रम सूक्ष्म आणि नग्न होत चाललाय
जेणेकरून चाबूक मारताना कपडे फाटणार नाहीत

पराभव टाळ्या वाजवतोय
एन्ड ऑफ हिस्ट्रीच्या

शेवट मृत्यूचं चुंबन घेणार कि पुनर्जन्माचं
कुणालाच माहित नाही

बसवेश्वर म्हणाले सर्व श्रमांना समान प्रतिष्ठा
आणि सर्व श्रमांना समान वेतन

माझ्यासाठी कम्युनिझम बस्वेश्वरांच्यापासून सुरु होतो

छातीला छाती भिडवून
हात पकडत श्रमांना मिठीत घेण्याचं युग संपलं का ?



शंकराच्या चंद्रकोरीपाशी मी कधीच विळा ठेवला नाही
गांधींचा झाडू ठेवला
आणि नांगर

अनुभवमंडपात बसतांना बसवेश्वरांना हत्या होण्याआधी जी निराशा आली होती
तीच आता सर्व श्रमिकांच्या  काळजात

पृथ्वीचं चुंबन घेऊ पाहणारे
स्वतःच्या ओठांना टिकवण्याची धडपड करतायत

मार्क्सचा जन्म काही राजांना मुकुट देण्यासाठी झाला होता
आणि त्यांना मुकुट मिळाले
त्यांनी राज्य केले
आणि सर्व राज्यांप्रमाणे हीही राज्ये धुळीला मिळाली

आता ती धूळ भारताच्या प्रत्येक गल्लीतून
हरलेल्या राणीसारखी हिंडतीये
म्हणून शोक कशाला ?



मे डे डिमॉन्स्ट्रेशन्सच्या विळाफेकीवर
एक सभ्य मर्डर
तरंगणारा

गडचिरोलीचा धूर हॅंड्सप करून निघून गेलाय

तुम्हांला ह्या देशाची मूळंच पकडता आली नाहीत
आणि तुम्ही झाडावर शेखचिल्लीसारखे बसून

सेमसेक्स मॅरेज सारखं एक फिलिंग
ज्याला गव्हाच्या दाण्याची परिपूर्ती नाही

चे गव्हेराचे टी शर्ट घालून मी कधी फिरलो नाही
मात्र बसवेश्वरांचे कायक मी आयुष्यभर सांभाळले

आळसाला वाट मिळू नये
आणि श्रमांना काट मिळू नये
हा समतोल साधावा कसा

माझ्या घरात माझी सारी भावंडं कामगार
ह्याची मला कधीच लाज वाटली नाही

त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला नाहीये
आणि प्रतिष्ठाही

सकाळ सूर्याचा कप घेऊन येते
प्रकाशाचा चहा पाजते
संध्याकाळी सूर्य समुद्रात विसळून निघून जाते
ह्यामागे केवढी अवाढव्य उलाढाल आहे
हे मी जाणतो

श्रमांची प्रतिष्ठा सकाळच्या कपापासून सुरु होते



कम्म्युनिझम मेला तरी श्रम अमरच असणार आहेत
त्यामुळं श्रमाला टाळू म्हणणारे युटोपियात जगतायत

मी युटोपियन नाही

पण
इकॉनॉमिक क्रायसिस आला कि कम्युनिझमला संधी
इकॉनॉमिक डिप्रेशन आले कि भांडवलशाहीचा अंत
इतका भोळसट्पणाही
बसवेश्वरांनी आम्हाला शिकवलेला नाही

डोळे ताणवून सरोवरात समुद्र पाहणे
ही विद्या नाही
भ्रम आहे

१९८९ न्यू वर्ल्ड ऑर्डर
आणि २००८ बँकिंग सिस्टीम कोलॅप्स म्हणजे
वर्ल्ड ऑर्डर कोलॅप्स
इतकं सर्व सोपं ?

गेले कित्येक महिने
नवा दरवाजा उघडलाय
आणि आत कोणीतरी वाट पाहतंय

कार्पोरेटशाही म्हणजे काय रामसेचा  हॉरर पिक्चर वाटला काय तुम्हाला
कि सापडली भुतं
आणि पिटाळली भूतं ?



जेव्हा श्रमांचा  चेहरा दिसत नाही
तेव्हा श्रमांचे पाय दिसतात हात दिसतात

आणि ज्यांना हातपाय दिसत नाहीत
त्यांना डोळे नसतात

वजनी आधारांना
आजारसुद्धा कबूल करू न देणारी व्यवस्था

डोळे कायम फुटबॉलसारखे हलते

रक्ताचा लाल पाठलाग आणि मागोवा

वाली नसल्यासारखी तगमग तगमग

श्रमांना इतका पोरकेपणा कुठल्या युगात होता ?



१ मे अजून श्रमांची पुण्यतिथी म्हणून साजरी करत नाही हीच मेहरबानी

नेमकं काय चुकलंय ?

टोकाला जाणारे धड मध्यातही परतलेले नाहीत

एक दारू तयार झाली आणि सम्पली इतकंच ?

आधी हम दो हमारा एक
मग पूर्ण निर्व्यसनी असणे
मग
मग

मी बोलायला खूप बोलू शकतो
माझ्या जीभेने राजीनामा दिलाय

तुम्ही दारूची बॉटल फोडा
आणि कंडोम वापरा

लेबर इज अ टेल कंट्रोल्ड बाय अँन इडियट

श्रीधर तिळवे नाईक

(नेट सीरिजमधील नेट थिम्स मधून )









No comments:

Post a Comment